धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, येडशी येथे आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

सदर मोहीम मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. प्रनिता क्षिरसागर, आरोग्य सहाय्यक सुर्यकांत गंगावणे, सुनील कदम, आरोग्य सहाय्यिका स्वरूपता दारफळकर, अश्विनी कांबळे, आरोग्य सेविका फुलाबाई कोळी,आरोग्य सेवक युवराज चौगुले, गजानन सुतार तसेच येडशी गावातील सर्व आशा सेविका यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे. धाराशिव तालुक्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलींना ही लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच जवळील उपकेंद्र, आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या संपर्कात राहून लसीकरण करून घ्यावे. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारी ही मोहीम मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

 
Top