भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी संस्कृती नितीन गुंजाळ हिची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा 2025 - 26 मधील राष्ट्रीय आविष्कार अभियान या उपक्रमा अंतर्गत राज्यांतर्गत अभ्यास भेटीसाठी भूम तालुका अंतर्गत निवड करण्यात आली असून, ही शासकीय सहल दिनांक 11 मार्च रोजी रवाना झाली. 

आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी संस्कृती नितीन गुंजाळ हिच्या शासनाकडून राज्यांतर्गत अभ्यासभेट सहलीसाठी झालेल्या निवडीमुळे तिच्यासह शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदरील शासकीय  अभ्यासभेट सहल ही दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली असून या सहलीत लातूर शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे गटशिक्षण अधिकारी यांनी सांगितले.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना राजीव गांधी प्राणी संग्रहालय,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटोरोलॉजी सेंटर,द इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रॉफिजिक्स सेंटर,पिंपरी चिंचवड सायन्स पार्क,स्वामी नारायण मंदिर,श्रीमंत दगडू शेठ हलवाई मंदिर,शनिवार वाडा,लाल महाल यासारख्या ऐतिहासिक, वैज्ञानिक, धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे.या सहलीमध्ये तालुक्यातील शाळांमधून इयत्ता सहावी ते आठवी गटातून आरसोली,पाटसांगवी,चुंबळी,  निपाणी येथील एकूण सहा विद्यार्थ्यांनीची निवड करण्यात आली आहे.अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडणार असून राज्य शासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top