धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन हरभरा खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी व राज्याच्या कृषीमंत्र्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाची लागवड करतात. शासनाने हरभरा खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली असली तरी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी ही अट बंधनकारक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे डॉ. पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा किंवा तांत्रिक ज्ञानाची कमतरता असल्यामुळे वेळेत ई-पीक पाहणी नोंदविता येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाइन हरभरा खरेदी नोंदणीपासून वंचित राहत असून शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन हरभरा खरेदीसाठी असलेली ई-पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.
