तुळजापूर (प्रतिनिधी)-   तीर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तसेच शिवाजी महाराज दरवाजा बाहेरील पायऱ्यांवर गुटखा-मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. मंदिर परिसरात अशा प्रकारे घाण करणाऱ्यांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटवून त्यांच्यावर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंदिर प्रशासनाने दिला आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा 2003 नुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, साठा किंवा विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. मात्र, मंदिर परिसरात काही मंडळी विशेषतः युवक वर्ग वारंवार गुटखा, मावा यांचे सेवन करून पायऱ्या व परिसरात थुंकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या प्रकारामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरची प्रतिमा मलिन होत असून मंदिराचे पावित्र्य राखले जात नसल्याची खंत प्रशासनाने व्यक्त केली आहे. भाविक आणि नागरिकांनी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. यापुढे मंदिर परिसरात गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचे आढळल्यास सीसीटीवही फुटेज तपासून संबंधितांवर आवश्यक त्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना मंदिर प्रशासनाने दिली आहे.


 
Top