धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 28 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा देशव्यापी शुभारंभ करण्यात आला. या अनुषंगाने महाराष्ट्रातही दि.8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- योडर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. भारत सरकार व महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला  प्रतिबंध करण्यासाठी ही एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एक प्रमुख आजार असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लसीकरण प्रभावी ठरते.या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात ही मोहीम प्रारंभी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार असून त्यानंतर एचपीव्ही लसीकरणाचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत वय वर्षे 14 ते 15 या वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस मोफत देण्यात येणार आहे. GARDASIL-4 (Quadrivalent) ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना डब्ल्युएचओ यांनी प्रमाणित केलेली आहे.या लसीचा 0.5 मिली इतका सिंगल डोस स्नायूमध्ये डाव्या हाताच्या वरच्या भागात देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश असून या सर्व ठिकाणी लाभार्थींना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.

लाभार्थी व त्यांच्या पालकांनी लसीकरणासाठी येताना आधार कार्ड किंवा आभा आयडी कार्ड तसेच मोबाईल नंबर सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच मुलींना लसीकरणासाठी आणताना पालकांनी त्यांना नाश्ता किंवा जेवण करून आणावे,असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणासंदर्भातील कोणत्याही शंका किंवा माहितीकरिता 104 हा हेल्पलाईन क्रमांक निश्चित करण्यात आलेला आहे.तथापि, काही परिस्थितीत एचपीव्ही लस घेऊ नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींनी पूर्णपणे बरे होईपर्यंत एचपीव्ही लस घेऊ नये.मागील लसीकरणामुळे एलर्जी रिऍक्शन आलेली असेल किंवा यीस्टची ऍलर्जी असल्यास एचपीव्ही लस घेऊ नये. गर्भावस्था असल्यास  लस घेऊ नये. अपेक्षित वयोगटाबाहेरील मुलींना ही लस देण्यात येणार नाही.तसेच ज्यांना यापूर्वी एचपीव्ही लस देण्यात आलेली आहे,त्यांनी पुन्हा ही लस घेऊ नये. “गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त भविष्यासाठी आपल्या मुलींचे वेळेवर लसीकरण करणे ही काळाची गरज आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मोहिमेत सक्रियपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक,धाराशिव यांनी केले आहे.

 
Top