धाराशिव (प्रतिनिधी)-  मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार व्यक्त करत परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील दालनात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास केवळ आजचाच नव्हे,तर पुढील शंभर वर्षांचा विचार करून दूरदृष्टीने आणि उत्कृष्ट दर्जाने व्हावा,अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत तुळजापूर येथील श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या सुमारे 582.17 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केली. यावेळी बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये,यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने करावा. देशातील नामांकित विकासक आणि तज्ज्ञ संस्थांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचेही निर्देश सरनाईक यांनी दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.व्ही.भंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय आडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शैलेंद्र चौहाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केक यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 



विविध विकास कामाचा आढावा

या बैठकीत धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर महत्त्वाच्या विकासकामांचाही सखोल आढावा घेण्यात आला.धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या 500 खाटांच्या आधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, धाराशिव व परंडा येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम,तुळजापूर येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह तसेच विविध रस्ते विकास प्रकल्पांची स्थिती यावर चर्चा झाली. 

 
Top