भूम (प्रतिनिधी)- नगरसेवक चंद्रमणी गायकवाड यांनी आपल्या आई स्व. विमल गोरख गायकवाड यांच्या स्मरणार्थ भूम येथील आठवडी बाजारात नागरिकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आईच्या नावाने गेल्या 4 वर्षांपासून ही पाणपोईची सेवा अविरत सुरू असून या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची तहान भागावी, यासाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. आठवडी बाजारात तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येत असतात. कडक उन्हात फिरणाऱ्या नागरिकांना थंड पाण्याची सुविधा मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नगरसेवक गायकवाड यांनी स्वखर्चातून थंड जारचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी नगर परिषद बांधकाम सभापती अनिल शेंडगे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शाळू (महाराज), नियोजन सभापती रामराजे कुंभार, पाणी पुरवठा सभापती नवनाथ रोकडे, आबासाहेब मस्कर, ॲड. अमृताताई गाढवे, नगरसेवक गणेश वीर, दत्ता काळे, अमोल गाडे, विठ्ठल बागडे तसेच महेंद्र गायकवाड, अज्जू भाई वाघमारे, सोनम बनसोडे, डॉ. झरकर, दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
