धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी जमीन बळकावून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणात सेरेनिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या कामकाजाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तुळजापूर येथील गट क्रमांक 284 व 285 मधील जमिनी संदर्भात सुमारे 400 एकर क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, विनापरवानगी जमिनीवर प्रवेश, मोजमाप व विविध कामे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मालकी हक्कांवर गदा येत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात शेतकरी रेणुका राजेश राठोड व रुक्मिणबाई निलाप्पा राठोड यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर तुळजापूर न्यायालयात दिवाणी दावा क्र. 556/2025 दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा तक्रार सादर करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, 13 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयाकडून गावच्या तलाठ्यामार्फत व्हॉट्सपद्वारे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले असून 18 मार्च रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुनावणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असून मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच 15 व 16 मार्च 2026 रोजी कंपनी प्रतिनिधींनी संबंधित जमिनीवर जाऊन मोजमाप करण्याचा प्रयत्न केल्याने महिला शेतकऱ्यांशी वाद निर्माण झाल्याचा तसेच दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाला माहिती देऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना कोणतीही जबरदस्तीची कारवाई थांबवावी, संबंधित कंपनीच्या हालचालींची चौकशी करावी, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पाहणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, रूक्मिणबाई राठोड, रेणुका राठोड यांची स्वाक्षरी आहे.   

 
Top