धाराशिव (प्रतिनिधी)- नाट्यस्पर्धा ही केवळ जिंकणे-हरणे यापुरती मर्यादित नसून प्रत्येक स्पर्धकासाठी ती “जय-पराजयातून शिकण्याची” संधी असते. ती केवळ कला सादर करण्याची संधी देत नाही, तर जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकदही देते.नाट्यस्पर्धा ही कलाकाराला घडवणारी शाळा असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत यांनी केले.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे 27 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव च्यावतीने राज्यस्तरीय ‘गंगाधर करंडक’ एकांकिका नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि कलावंत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गंगाधर करंडक स्पर्धेच्या रविवार 29 मार्च रोजी बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत बोलत होत्या.
गंगाधर करंडक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शिर्के-सामंत, सिने अभिनेत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्या सविता मालपेकर, डॉ.अभय शहापूरकर,दादा साळुंके , उद्योजक सुमित कोठारी, नगरसेविका अर्चना विशाल शिंगाडे, पत्रकार रवींद्र केसकर, ज्येष्ठ नेते सुधाकर गुंड, उद्योजक अमित मोदाणी, सुदेश माळाळे, आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारीणी सदस्य विशाल शिंगाडे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नीलिमा शिर्के - सावंत म्हणाल्या की नाट्यस्पर्धेमुळे कलावंतांना पुढे जाण्यास मोठी मदत होते. स्पर्धेमुळे कलाकारांना व्यासपीठ मिळते, त्यांचे कौशल्य लोकांसमोर येते. धाराशिव शहरात बालरंगभूमीची लवकरच शाखा स्थापन करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना शिर्के यांनी दिले.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद धाराशिव शाखेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच पोलिस भरतीमध्ये अंतिम निवड झाल्या बद्द्ल अभिजीत ओव्हाळ आणि सुधाकर झेंडे यांचा तर नगरसेवक म्हणून विजयी झाल्या बद्द्ल अर्चना विशाल शिंगाडे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी हार आणि सन्मानचिन्ह देऊन केला. स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व विजेत्यांचा मान्यवरांनी करंडक, सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या नाट्य स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके ,ज्येष्ठ अभिनेते प्रशांत तपस्वी, नाट्य रंगकर्मी अश्विनी तडवळकर यांनी केले.सूत्रसंचलन नाट्य परिषदेचे सुगत सोनवणे यांनी तर प्रस्ताविक आयोजक विशाल शिंगाडे यांनी तर आभार विजय उंबरे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी.जी.कुलकर्णी, सुगत सोनवणे,रोहित कुलकर्णी,ताहेर शेख, विजय उंबरे, अविनाश बनसोडे , सुहास झेंडे, दीपेश दणाने, आकाश वाघमारे, यशवंत शिंगाडे, सुमित शिंगाडे, सारीपुत शिंगाडे,प्रवीण सोनवणे, यांच्या सह शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ही नाट्य स्पर्धा पाहण्यासाठी शहर व परिसरातील नाट्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत ‘बिटवीन द डोअर’ (अनुभूती संस्था, बदलापूर) या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत 51,990 रुपये व करंडक जिंकला. द्वितीय क्रमांक 31,000 रुपये ‘हमको हिंदी नही आती’ (ज्ञानसाधना नाट्य परिवार, ठाणे) तर तृतीय क्रमांक 21,000 रूपये ‘पहिली रात्र’ (क्रिदन एंटरटेनमेंट, पुणे) यांना मिळाला. चतुर्थ 11,000 रूपये ‘बुजगावणे’ (रंग फौज सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, संभाजीनगर) आणि उत्तेजनार्थ 5000 रूपये ‘प्रेम की यातना’ (दीपवैभव नाट्य संस्था, सोलापूर) यांची निवड झाली.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखनासाठी गोपाळ वाघमारे (बुजगावणे) प्रथम 1500 रूपये, अजय पाटील (हमको हिंदी नही आती) द्वितीय 1000 रूपये, संकेत मोडक (पहिली रात्र) तृतीय 500 रूपये ठरले. दिग्दर्शनात अमोल ताटे (बिटवीन द डोअर) प्रथम 1500 रूपये, सुमेध गायकवाड-साहिल कदम (हमको हिंदी नही आती) द्वितीय 1000 रूपये, संकेत मोडक (पहिली रात्र) तृतीय 500 रूपये ठरले.
अभिनय (स्त्री) विभागात वैष्णवी दळवी (पहिली रात्र) प्रथम 1500, काजल अटकारे (पुंडलिक वरदा) द्वितीय 1000, सई दरेकर (प्रेम की यातना) तृतीय 500 ठरल्या. अभिनय (पुरुष) विभागात साहिल कदम (हमको हिंदी नही आती) प्रथम 1500, ऋषीकेश कारके (बुजगावणे) द्वितीय 1000, अमोल ताटे (बिटवीन द डोअर) तृतीय 500 ठरले.