उमरगा (प्रतिनिधी)- सध्या सर्वत्र कुशल कामगारांची आवश्यकता असुन युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन त्यांच्या ज्ञानाचे रुपांतर रोजगारात करावे असे मत तहसिलदार गोविंद येरमे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग  अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव व हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा  यांच्या  संयुक्त विद्यमाने  हुतात्मा वेदप्रकाश शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्यावेळी तहसिलदार येरमे बोलत होते. 

राजेंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. 

यावेळी जिल्हा कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अक्षय घोडके, मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला, आय. एम. सी.  सदस्य संतोष वखारे,  प्राचार्य संजय माळकुंजे, गटनिदेशक नागनाथ माकने उपस्थित होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. गुरव यांनी प्रस्ताविक करताना उमेदवारांना उपलब्ध असलेल्या विविध करिअर विषयक संधी बाबत माहीती दिली. व शासनाच्या  कौशल्य विकास प्रशिक्षणाचा व मेळाव्यातील खाजगी आस्थापनेकडील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे  उमेदवारांना आवाहन केले.

या रोजगार मेळाव्यात  236 जणांनी  नोंदणी केली.180 उमेदवारांनी आठ खाजगी आस्थापनाकडे  मुलाखत दिली यापैकी 118 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली. या रोजगार मेळाव्यात खाजगी क्षेत्रातील 8  नामांकित खाजगी कंपन्या, आस्थापना  सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे,  व  धाराशिव जिल्ह्यातील कंपन्यांचा समावेश होता. घोडके उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडील रिक्त पदे वेतन व इतर सुविधा बाबत उमेदवारांना माहिती दिली. 

यावेळी रोजगार मेळाव्यासोबत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना,  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांचे स्टॉल लावून माहिती देण्यात आली. पवन नाईकवाडे यांनी सुत्रसंचलन केले तर गटनिदेशक नागनाथ माकणे यांनी आभार मानले.  

यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, कर्मचारी व  पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top