उमरगा (प्रतिनिधी)- मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकराज असल्याने काही प्रमाणात संबंधित शासकीय यंत्रणेचे काम कासवगतीने सुरू होते. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन नवीन पदाधिकारी यांनी पदभार स्वीकारला आहे.
याच अनुषंगाने उमरगा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती ॲड.आकांक्षाताई चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड व सर्व पंचायत समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत पंचायत समितीची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न झाली. याप्रसंगी सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागांच्या योजना व कार्यपद्धतीची माहिती उपस्थितांना यावेळी देण्यात आली.
सदर बैठकीत सभापती यांनी प्रामुख्याने घरकुल लाभार्थ्यांचे होल्ड केलेले बँक खाते परत सुरू करणे, गोठा व विहिरीचे कुशल व अकुशलची थकीत असलेली सर्व बिले तत्काळ अदा करणे, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, लसीकरणाबाबत जनजागृती करणे, आदी सूचना प्रशासनास केल्या. मागील काळात पंचायत समितीमध्ये काही भ्रष्टाचाराच्या चर्चा होत होत्या. यापुढील काळात पंचायत समिती मधील कोणीही अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांकडून लाच अथवा पैसे मागितल्यास त्यांच्यावर सज्जड कारवाईचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
सदर बैठकीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार, गटशिक्षण अधिकारी अमोल राजपूत, उपअभियंता जि.प.बांधकाम दिलीप बिराजदार, तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रीतापुरे, यांच्यासह परिवहन, जलसंधारण, पाणीपुरवठा, घरकुल, रोजगार हमी योजना, आदी प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
