मुरुम (प्रतिनिधी)-  काकांनी ज्या उद्देशाने शैक्षणिक संस्था उभी केली. त्या हेतूनेच वरिष्ठ  महाविद्यालयात चांगली माणसे नियुक्त केली. ती गुणात्मक, दर्जात्मक, चांगल्या विचारांची राहावीत, या भूमिकेतूनच चांगली माणसे निर्माण होणे, ही संस्थेची परंपरा राहिली असून ज्या कर्मचाऱ्यांनी संस्थेत राहून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळेच संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रात नाव होत आहे. महाविद्यालयातील कर्मचारी हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असले तरी ही त्यांची सेवानिवृत्ती नव्हे तर सामाजिक सेवेचा प्रारंभ असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपचे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. कार्यालयीन अधीक्षक राजू ढगे यांचा सोमवारी (ता. 30) रोजी नगर शिक्षण विकास मंडळाच्या वतीने माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बसवराज पाटील व बापूराव पाटील यांच्या हस्ते राजू ढगे व मायाताई ढगे यांचा संपूर्ण आहेर उपचार करून सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बसवराज पाटील होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, माजी प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, बीडचे कार्यकारी अभियंता शरीफ पटेल, धनराज मंगरूळे, मदन पाटील, देवेंद्र कंटेकुरे, प्राचार्य उल्हास घुरघुरे, इरफान मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी चैतन्यमूर्ति माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.                                  

अध्यक्षीय समारोपप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, वैजनाथराव ढगे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या चिरंजीवाला उत्कृष्ट शिक्षण, संस्कार दिले. त्यांनी माधवराव (काका) पाटील परिवाराचे ऋणानुबंध कायम ठेवत प्रामाणिक, निष्ठा व कष्टाच्या जोरावर काम करत राहिले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन काकांनी त्या काळात राजू ढगे यांना शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी दिली. त्यांनी देखील चांगले विचार जोपासून या परिसरात आपली ओळख निर्माण केली. आज ते सेवानिवृत्त होत असून, त्यांनी पुढील काळातही समाजासाठी चांगले कार्य करत रहावे.

सत्काराला उत्तर देताना ढगे म्हणाले की, या संस्थेने  मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. विविध शाळेतील सहशिक्षक, सहकारी मित्र, नातेवाईक, शहरातील पदाधिकारी-कार्यकर्ते आदींनी त्यांचा सत्कार केला.   


 
Top