तुळजापूर (प्रतिनिधी)-   महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचा चैत्र पौर्णिमा उत्सव यंदा दिनांक 30 मार्च 2026 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चैत्र यात्रेची आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

उत्सव कालावधीत 31 मार्च, 1 एप्रिल व 2 एप्रिल रोजी देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून, 1 एप्रिल रोजी देवीचा जोगवा असणार आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिस विभाग, आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता दिनांक 31 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत सर्व भाविकांना बीडकर पायऱ्या मार्गे प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


अशी आहे व्यवस्था

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष काळजी घेण्यात आली आहे. सोलापूर येथील प्रॉक्टो क्लिनिकच्या वतीने प्रथमोपचार पेट्यांमध्ये आवश्यक असणारी औषधे प्राप्त झाली आहे. तसेच उष्माघात टाळण्यासाठी  ज्युस टेट्रापॅकचे वाटप करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दर्शन मंडपात पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जाणार आहे. दर्शन मंडप व मंदिर परिसरात प्रकाशयोजना, फॅन, कुलर व एअर कुलिंग व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. गाभाऱ्यातील एअर कुलिंग प्लांटचे सर्व्हिसिंग पूर्ण झाले असून, जनरेटर व अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दिशादर्शक व सूचनादर्शक डिजिटल फलक बसविण्यात आले आहेत. तसेच अनाउन्समेंट सिस्टीमद्वारे वेळोवेळी सूचना देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे.

ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत रेफरल दर्शन पास बंद ठेवण्यात आले आहेत. 


 
Top