तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दरबारात चैत्र शुद्ध प्रतिपदा गुरुवार दिनांक 19 रोजी गुढीपाडव्यानिमित्ताने श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर शिखरावर सकाळी गुढी उभारण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसानिमित्त तुळजापुरात भक्ती, परंपरा आणि चैतन्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
पहाटे देवीजींना साखरेचा हार घालण्यात आला मुख्य महंत तुकोजी बुवा आणि वाकोजी बुवा यांच्या हस्ते शिखरावर गुढी उभारण्यात आली. नंतर गुढीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक अनुक्रमाले सह पुजारी मंदिर कर्मचारी उपस्थित होते.
आज आई तुळजाभवानीला साखरेचा हार, शिवकालीन दागिने घालण्यात आले होते. आज शहरातही घरोघरी गुढ्या उभारण्यात आले होत्या. रात्री मंदिर प्रांगणात छबीना काढण्यात आल्यानंतर गुढीपाडव्या सणाच्या धार्मिक विधीचा सांगता झाली. तुळजापूर तालुक्यात ग्रामीण भागातही गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजांनी आपल्या शेतात पांडवाचे पूजन करून गुढीपाडवा साजरा केला.

