धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर धाराशिव येथील रसायनशास्त्र विभागामध्ये “ऑक्सिडायजिंग ॲड रिडयुसिंग रियजंटस इन ऑरगॅनिक सिन्थेसिस ” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले (दि. 11 व 12 मार्च). ही कार्यशाळा - योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. आर. बी. चौगुले (संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव) हे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर डॉ. आर. एम. तिगोटे (रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव) हे अध्यक्षस्थानी होते. तसेच प्रा. डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजन व विद्यापीठ गीत गायनाणे झाली.
उद्घाटन कार्यक्रमात कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एम. के. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच या कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धीबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एम. तिगोटे यांनीही कार्यशाळेच्या संदर्भात माहिती देत ही कार्यशाळा उत्कृष्टरीत्या पार पडेल अशी आशा व्यक्त केली. उद्घाटक प्रा. डॉ. आर. बी. चौगुले यांनी आपल्या मनोगतात विज्ञान आणि साहित्य यांचे परस्पर नाते स्पष्ट केले तसेच कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. पी. बारकुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभय घोडके यांनी केले. या कार्यशाळेस सुमारे 150 विद्यार्थी व प्राध्यापकांनी उपस्थिती नोंदविली. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये रसायनशास्त्रातील ऑक्सिडायझिंग तसेच रिड्युसिंग रिएजेंट्स या विषयावर एकूण पाच विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यापैकी तीन सत्रांमध्ये ऑक्सिडायझिंग रिएजेंट्स व संबंधित अभिक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले, तर दोन सत्रांमध्ये रिड्युसिंग रिएजेंट्स या विषयावर सखोल माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये प्रा. डॉ. बापू शिंगटे (रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. एस. वाय. जाधव (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, दयानंद विज्ञान व कला महाविद्यालय, सोलापूर), डॉ. हरीश होल्ला (सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक, कलबुर्गी), प्रा. डॉ. शेषनाथ भोसले (रसायनशास्त्र विभाग, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक, कलबुर्गी) व डॉ. व्ही. डी. कडू (अधिसभा सदस्य व सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र संकूल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. एस. वाय. जाधव व डॉ. व्ही. डी. कडू यांची प्रमुख उपस्थिती होती, तर प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे हे अध्यक्षस्थानी होते. समारोपीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एम. के. पाटील यांनी कार्यशाळेचा अहवाल सादर केला. प्रा. डॉ. एस. वाय. जाधव यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांनी आपण या विभागाचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगून अशा प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम विभागात सातत्याने आयोजित केले जातात व त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीस चालना मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. पी. हावळ यांनी मानले, तर समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या दोन दिवसीय कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. के. पी. हावळ, डॉ. आर. एम. तिगोटे, डॉ. एम. के. पाटील, डॉ. आर. पी. बारकुल, कविता चव्हाण तसेच विभागातील सर्व संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.