तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये वाढत्या पाणीटंचाई व स्वच्छतेच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शुक्रवार दि. 20 मार्च रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे नगरसेवक अमोल कुतवळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उन्हाळ्याची सुरुवात होताच शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. यासोबतच काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी समोर येत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच स्वच्छतेच्या बाबतीतही गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, 20 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विरोधी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.“पाणीपुरवठा सुरळीत करावा, स्वच्छता राखावी आणि दूषित पाण्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा,” या प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तीर्थक्षेत्रात भाविकांचा वाढता ओघ आणि त्यातच मूलभूत सुविधांची बोंब प्रशासनासाठी ही गंभीर इशाऱ्याची घंटा ठरत आहे.