धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य साकार करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद नष्ट करून हिंदू वोटर बँक निर्माण करा. असे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले.
शनिवार दि. 21 मार्च रोजी रूपामाता उद्योग समुहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत कालीचरण महाराज बोलत होते. रूपामाता फाऊडेशनच्यावतीने कालीचरण महाराजांचे धाराशिव शहरात रविवार दि. 22 मार्च रोजी लेडीज क्लबच्या मैदानावर शिवतांडव, जगदंबेची आराधना आणि गोंधळ आदी कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता होणार आहेत. त्यानिमित्ताने कालीचरण महाराज धाराशिव शहरात आले आहेत. पुढे बोलताना जैन, बौध्द, शिख हे सर्व हिंदू धर्मातीलच असून, हाच सनातन धर्म आहे असे सांगितले. गौतम बुध्द हे विष्णूचे नवे अवतार होते. तर भगवान महावीर हे विष्णूचे आठवे अवतार होते असा उल्लेख कालीचरण महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला.
डोक्यात गोळी घाला
यावेळी पत्रकारांनी भोंदू महाराज अशोक खरात संदर्भात प्रश्न विचाराला असता त्यावर बोलताना कालीचरण महाराज यांनी आरोप सिध्द झाल्यानंतर भर चौकात अशा भोंदू महाराजाला डोक्यात गोळी मारावी असे सांगितले. धर्माच्या नावाखाली अधर्म चालत असेल तर दंड झालाच पाहिजे असेही कालीचरण महाराजांनी सांगितले.
