भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गटशिक्षण कार्यालय भूम यांच्यावतीने गुढीपाडवा प्रवेश वाढवा कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय महोत्सव प्राथमिक शाळा चुंबळी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंबळी येथे इयत्ता पहिली वर्गात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व भव्य मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना टोपी, फुलांचा हार, घाटीचा हार, फुगे, चेंडू देऊन सत्कार करण्यात आला व गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी भव्य सजावट व रोशनी करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन भूमचे गट शिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांनी केले. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी यांनी चुंबळी शाळेच्या विविध उपक्रमातील सहभागाबाबत गौरवोद्गार काढले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ टकले तसेच पांढरेवाडीचे मुख्याध्यापक योगेश चाळक, गावचे सरपंच कानिफनाथ गिराम, गटनेते अण्णासाहेब तांबे, शालेय बचत गट अध्यक्ष सिकंदर सय्यद तसेच शिक्षण प्रेमी नागरिक रमेश मोरे, महादेव कांबळे, कल्याण गिराम, सुलेमान शेख, केशव देशमाने, बालाजी वरळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बाचेवाड, राजेंद्र बागडे, मारुती साबळे, मनीषा खर्पे व गंगाबाई खंडागळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजीवन तांबे यांनी केले. तर आभार राजेंद्र बागडे यांनी मानले.
