भूम (प्रतिनिधी)- इराणमधील युद्धस्थितीचा आधार घेत देशांतर्गत बाजारात केळीच्या दरात कृत्रिम घसरण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला आहे. या प्रकारामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याची तक्रार त्यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात मोटे यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, पुणे तसेच धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. विशेषतः भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील डोंजा व तेरखेडा परिसर हा केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. दरवर्षी रमजान महिन्यात केळीला चांगली मागणी व दर मिळण्याची अपेक्षा असते. मात्र यावर्षी काही व्यापाऱ्यांनी जाणूनबुजून दर पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पूर्वी प्रति किलो सुमारे 25 रुपये दर असलेली केळी सध्या थेट 6 ते 10 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या दरकपातीमुळे केळी उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडले असून, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे केळी उत्पादक राज्य असले तरी एकूण उत्पादनापैकी केवळ एक टक्का केळी निर्यात होते. त्यामुळे स्थानिक बाजारातील दरावर शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न अवलंबून आहे. अशा परिस्थितीत युद्धाचे कारण पुढे करून दर घसरवणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे मोटे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व अनुदान द्यावे, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे.
