तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात आरक्षित जागा आहे पार्श्वभूमीवर  येथील बहुचर्चित यात्रा मैदान घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, “वाचवतंय कोण?” हा सवाल आता जनतेतून जोर धरू लागला आहे. चौकशी समितीने तपास पूर्ण केल्याची माहिती समोर येत असली तरी अहवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, समितीने तक्रारीतील काही मुद्द्यांना ‌‘क्लीन चिट‌’ दिली असली तरी बनावट रेखाकन नकाशे, बोगस कागदपत्रे व दस्त नोंदणी या गंभीर मुद्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. हा अहवाल आता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या टेबलवर जाणार असून, त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुळजापूर नगरपरिषदेने सर्वे नं. 138 मधील 2 हेक्टर 63 आर जमीन यात्रा मैदानासाठी संपादीत केली होती. मात्र हीच जमीन हडप करून विक्री केल्याची गंभीर तक्रार संभाजी नेपते व किरण यादव यांनी केली होती. तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या अध्यक्षतेखालील प्राथमिक समितीने काही मुद्यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीनेच आता बनावट नकाशे, अकृषी परवाने, बांधकाम मंजुरी आणि खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये मोठे गैरप्रकार झाल्याचे निष्कर्ष काढल्याची चर्चा आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आणि आमदार सुरेश धस यांनी लक्ष घातल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली होती. मात्र अजूनही फाईल हालचाल संथच असल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनीही कारवाईसाठी आवाज उठवत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 


 
Top