तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयात 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाची सुरुवात आर्या रोचकरी या मुलीला लस देऊन करण्यात आली.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चोरमले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रोचकरी तसेच रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लसीकरणानंतर डॉ. चोरमले यांच्या हस्ते संबंधित मुलीचा सत्कार करण्यात आला. डॉ. चोरमले यांनी यावेळी सांगितले की, एचपीव्ही लस ही 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी दिली जाते. ही लस सुमारे 90% पर्यंत कॅन्सरचा धोका कमी करण्यात प्रभावी आहे.
लसीचे दोन डोस दिले जातात.
डॉ. चोरमले यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, वेळेवर एचपीव्ही लस दिल्यास शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे आपल्या मुलींच्या सुरक्षित भवितव्यासाठी ही लस नक्की द्यावी.” यावेळी एचपीव्ही लस बाबत आवाहन करताना स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रोचकरी म्हणाल्या की, तुळजापूर तालुक्यातील व शहरातील नऊ ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी ही लस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात एचपीव्ही लस उपलब्ध आहे
तुळजापूर तालुक्यात सुरू झालेला हा उपक्रम मुलींच्या आरोग्यासाठी मोठा टप्पा मानला जात असून, भविष्यात कॅन्सरमुक्त समाजाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.
