तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 47 वा सामुदायिक विवाह सोहळा 10 मे 2026 रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी वधू-वरांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केले आहे.

फाउंडेशनचे संस्थापक तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा 2006 मध्ये सुरू झाली. समाजात एक आदर्श उपक्रम म्हणून या सोहळ्याने वेगळी ओळख निर्माण केली असून यंदा या उपक्रमाला 21 वे वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या 20 वर्षांत एकूण 46 सामुदायिक विवाह सोहळे यशस्वीपणे पार पडले आहेत. या सर्व सोहळ्यांमधून आतापर्यंत 3203 जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला असून सामुदायिक विवाहामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसत आहे. तसेच साधेपणाने विवाह करण्याची प्रेरणा समाजाला मिळत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या उपक्रमाला विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धर्मनिरपेक्षतेचा आदर्श जपत विविध धर्मांच्या जोडप्यांनी या सोहळ्यात सहभागी होत विवाह केला आहे. गेल्या 20 वर्षांत हिंदू धर्मातील 2490, बौद्ध समाजातील 681, मुस्लिम समाजातील 21, ख्रिश्चन धर्मातील 4 आणि जैन समाजातील 7 जोडपी या सामुदायिक विवाह सोहळ्यातून विवाहबद्ध झाली आहेत. दरम्यान, 10 मे रोजी होणाऱ्या 47 व्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम नोंदणीची मुदत 30 एप्रिल 2026 आहे. इच्छुक वधू-वरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी संपर्क रोहन देशमुख संपर्क कार्यालय, जुन्या बस स्टँडसमोर, आयसीआयसीआय बँकेखाली, हंगरगेकर कॉम्प्लेक्स, तुळजापूर. विनोद देवकर  संपर्क : 9923800256 लोकमंगल मल्टीस्टेट, पोलिस लाईन समोर, तीर्थकर कॉम्प्लेक्स, आनंद नगर, धाराशिव.


 
Top