धाराशिव (प्रतिनिधी)-  संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यापर्यंत जाब विचारण्याची ताकद संघटना निर्माण करते.बहुजनांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बहुजन रयत परिषद संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु हे सर्व करत असताना पदाधिकाऱ्यांनी पद केवळ हातात घ्यावे, ते डोक्यात घेऊ नये. आपण सर्वांनी नेहमीच बहुजन नावाची गरिमा जपण्याचे कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे उद्गार बहुजन रयत परिषद संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहातील आयोजित बैठकीत काढले.

त्या पुढे म्हणाल्या की, या बैठकीसाठी महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत. महिला वर्गामध्ये गुणवत्ता आहे. या महिला संघटनेच्या पदाच्या माध्यमातून आपल्या गुणवत्तेला वाव देऊन महिला सबलीकरण करतील असा मला विश्वास आहे. यासाठी बहुजन रयत परिषद सर्वांना सर्वतोपरी मदत करेल.  महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना उद्योग, व्यवसाय, भांडवल,मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बहुजन रयत परिषद ही संघटना करेल. त्याचबरोबर वैद्यकीय मदतीसाठी अनेक वेळा बहुजन रयत परिषद संघटना बहुजन समाजासाठी पुढे असते आणि यापुढे देखील राहील असे त्या म्हणाल्या.

यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे, प्रा.डॉ.मारुती लोंढे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.  सदर बैठकीचे आयोजन बहुजन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.लक्ष्मणराव ढोबळे आणि प्रदेशाध्यक्षा ॲड . कोमल ताई साळुंखे-ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


 
Top