तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरात आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने श्री तुळजाभवानी देवींची विशेष पूजा करण्यात येऊन देवीला पारंपरिक पद्धतीने रंग लावण्यात आला.
सकाळच्या अभिषेक पूजेनंतर देवीला पांढराशुभ्र शालू नेसविण्यात आला. त्यानंतर त्या पांढऱ्या शालूवर सप्तरंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. महंत व पुजाऱ्यांनी देवीला रंग लावून पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमीच्या दिवशी देवीची विशेष पूजा करून तिला रंग लावण्याची परंपरा आहे. त्यानंतर पुजारी व भाविक एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा उत्सव साजरा करतात. या उत्सवात प्रामुख्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात येतो. यावेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, पुजारी बांधव तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

