भूम (प्रतिनिधी)- आजच्या काळात डोहाळे समारंभ प्रामुख्याने मुलींसाठी साजरे केले जातात. मात्र या परंपरेला वेगळी कलाटणी देत धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात मुक्या प्राण्याचेही डोहाळे पारंपरिक रितीरिवाजानुसार साजरे करण्यात आल्याची अनोखी घटना पाहायला मिळाली.
भूम शहरातील आलमप्रभूनगर येथील शेतकरी बापू रमेश बाराते यांनी गायीवरील अतूट प्रेम जपत महाराष्ट्राची शान असलेल्या खिल्लार गोवंशातील ‘चंदन’ नावाच्या गायीचे डोहाळे व ओटी भरण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. या अनोख्या उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या प्रसंगी परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने चंदन खिल्लारी गायीची ओटी भरून डोहाळे पुरवले. सर्व विधी अगदी ठरलेल्या पद्धतीने पार पाडण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. बापू रमेश बाराते यांच्या घरी सध्या 40 ते 50 जनावरे असून त्यामध्ये तब्बल 28 वर्षांचा बैल आजही जिवंत आहे. तसेच त्यांच्या कडे असलेली ‘देवणी’ नावाची गाय जन्मल्यापासून आंधळी असूनही आजपर्यंत त्यांनी तिची प्रेमाने सेवा केली आहे.
गायींविषयी असलेले प्रेम आणि जनावरांची जपणूक हा शेतकरी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे उदाहरण बापू बाराते यांनी या उपक्रमातून दाखवून दिले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही कल्पना त्यांच्या मनात होती. यावर्षी ती प्रत्यक्षात साकारत त्यांनी भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात कौतुकाची चर्चा रंगली असून “जनावरांवर प्रेम करा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. खिल्लार गायीचे पारंपरिक पद्धतीने डोहाळे, भूममध्ये कौतुकाची चर्चा.
