तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता यांच्या पुण्यभूमीत दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्रात आजही अद्यावत व सुसज्ज रुग्णालय नसल्याची वस्तुस्थिती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तुळजापूर येथे 200 खाटांचे आधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पूर्वी लातूर रोडवर अडीच एकर जागेत असलेले उपजिल्हा रुग्णालय आता महामार्ग विस्तारामुळे केवळ दोन एकर जागेत उभे आहे. त्यातही इमारतीचे नियोजन व्यवस्थित नसल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काम करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तुळजापूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज हजारो-लाखो भाविक येतात. मात्र गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना सोलापूरसह इतर मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक फटका बसत असून अनेकांचे प्राणही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात यंत्रसामुग्री आणि डॉक्टरांची यंत्रणा उपलब्ध असतानाही सुसज्ज इमारतीचा अभाव ही मोठी अडचण ठरत आहे. पूर्वी येथे सुमारे 400 ओपीडी होत असताना सध्या 800 पेक्षा जास्त रुग्णांची ओपीडी होत आहे. ऑपरेशनचे प्रमाणही वाढले आहे. मात्र जागा अपुरी असल्याने वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागत आहे... तीर्थक्षेत्र तुळजापूर विकासासाठी जवळपास दोन हजार कोटीचा विकास आराखडा मंजूर केला आहे मात्र यातही आरोग्याबाबत कुठलेही उपाययोजना नसल्याचे आरोप नागरिकातून होत आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार करणे येथील रुग्णालयासाठी जवळपास अशक्य ठरू शकते. त्यामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे हे भाविकांच्या जीवाशी खेळ ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री च्या नावाने हॉस्पिटल उभारण्याची चर्चा होती मात्र ती चर्चा सध्या हवेतच विरली आहे तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या मदतीने संस्था येथे हॉस्पिटल चालवण्याच्या तयारीत होती तीही चर्चा आता हवेतच विरली आहेत 

दरम्यान, देश-राज्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी येतात, मात्र येथील आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेऊन तुळजापूर येथे जिल्हा दर्जाचे अत्याधुनिक रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.


 
Top