धाराशिव (प्रतिनिधी)- आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे औषधी निर्मिती व आरोग्य क्षेत्रात वाढणारे उपयोग पाहून धाराशिव शहरातील नामांकित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात फार्मसी विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) टूल्स संदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षणासाठी संभव फाउंडेशन, बेंगळुरू येथील प्रशिक्षक रोहन घाडगे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा दैनंदिन जीवनातील उपयोग, आरोग्य,कृषी, पर्यावरण ,औषध निर्मिती शैक्षणिक यासारख्या क्षेत्रातील वापर तसेच करिअर आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स, एजेंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स तसेच रिझ्युमे बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे शिक्षण हे केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी मर्यादित नसून सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.फार्मसी क्षेत्रातही त्याचा उपयोग व मोठा फायदा होऊ शकतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग पेमेंट ऑफिसर प्रा.अशोक जगताप, फार्मसी चे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.जी.बी. चिवटे, विभागप्रमुख डॉ. पी. टी. माने व त्यांच्या सहकारी टीमने विशेष परिश्रम घेतले. हे तीन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा भविष्यात आम्हाला फायदा होईल. असा विश्वास व्यक्त केला.
