तुळजापूर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास, तसेच पाणी व कचरा व्यवस्थेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत, अशी प्रार्थना छत्रपती संभाजीनगरचे नूतन महापौर समीर राजूरकर यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवानीच्या चरणी केली. तुळजापूर भेटीदरम्यान आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
तुळजापूरमध्ये आगमन होताच स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने महापौर समीर राजूरकर यांचा फेटा बांधून, शाल, हार व बुके देऊन भव्य सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना महापौर राजूरकर यांनी मिश्किल शैलीत प्रतिक्रिया देत म्हटले, “मी छत्रपती संभाजीनगरचा महापौर झाल्यानंतर अनेक ठिकाणी गेलो; मात्र इतका भव्य सत्कार कुठेच स्वीकारला नव्हता. तुळजापूरकरांनी मात्र फेटा बांधून, हार-बुके देऊन मोठा सत्कार करून जणू बदला घेतला,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. या प्रसंगी तुळजापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील सह शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौरांच्या या भेटीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
