उमरगा (प्रतिनिधी)- आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला असून ए. आय, चाट जी पीटी , गुगलच्या साह्याने जागतीक पातळीवरील ज्ञान क्षणात आपण मिळवू शकतो, याच ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारी बनावेत व देशाची सेवा करावी असे मत नगर विकास मंत्रालयातील निवृत साहययक सचिव विद्यासागर चव्हाण यांनी व्यक्त केले.
शहरातील मायक्रोकॉम संस्थेला 26 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यार्थी मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी विद्यासागर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री बाबाजी मकानदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम एज्युकेशन फांउडेशन जिल्हा संपर्क अधिकारी प्रा. सुमित कोथिंबीरे हे उपस्थित होते. यावेळी बाबाजी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर संस्कार जपणे गरजेचे असून जीवनात आई वडीलांची सेवा व गुरुंचा आदर करणे ही भारतीय संस्कृती असून हीं जोपासने काळाची गरज आहे असे विचार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्थेचे संचालक प्रा युसूफ मुल्ला यांनी केले व आभार युनूसभाई शेख यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
