भुम (प्रतिनिधी)- परंडा शहराजवळील मुंगशी रोड शेजारील शेतात गुंगीकारक औषधीद्रव्य पदार्थ तथा 14. 510 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत असलेला एमडी (मेफेडोन) नावाचा अंमली पदार्थ तथा ड्रग्ससह एकास परंडा पोलीसांनी अटक केली. एमडी ही सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रती ग्रॅम किंमत 15 हजार रुपये प्रमाणे एकुण 2 लाख 17 हजार 650 रु किंमतीचा एमडी (मेफेडोन) हा अंमली पदार्थ व मोटार सायकल किंमत 15 हजार रुपये अशी एकुण किंमत 2 लाख 32 हजार 650 रुपयाचा माल बेकायदेशिररीत्या विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेला माल जप्त केला.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बालाजी नवनाथ सोनवने (वय 45 वर्षे ) रा. इंदीरानगर, परंडा हा परंडा ते मुंगशी जाणाऱ्या रोडवर गफार मुजावर यांच्या शेताजवळ शनिवारी दि .28 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास 14.510 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत असलेला एमडी (मेफेडोन) नावाचा अंमली पदार्थ तथा ड्रग्स बेकायदेशिररीत्या विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेला मिळुन आला. पोहेकॉ नितीन गुंडाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून त्यास मुद्देमालासह अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक असाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खरात यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुप्त माहिती वरून पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना व उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक खरात, शिंदे, गुंडाळे, राउत, अडसुळ, समर, सरगर, शेख यांना सोबत घेऊन हि कारवाई केली.
