धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हाभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या जय बजरंग प्रीमियर लीग 2026 (पर्व 5 वे) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जय बजरंग स्पोर्ट्सच्या वतीने करण्यात आले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ मर्यादित असलेल्या या स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष असून, यामध्ये खेळाडूंची निवड लिलाव पद्धतीने केली जाणार असल्याने ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक सचिन शिंदे यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 51 हजार रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 31 हजार रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीजसाठी 10 हजार रुपये, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या नियमावलीनुसार, यामध्ये एकूण 16 संघांना प्रवेश दिला जाणार असून, प्रत्येक संघात 13 खेळाडूंचा समावेश असेल. सर्व सामने प्रत्येकी 6 षटकांचे खेळवले जातील. क्रिकेट शौकिनांसाठी ही स्पर्धा युट्युब लाईव्हच्या माध्यमातून थेट पाहण्याची सोयही करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंची नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत राबवण्यात आली होती. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी जय बजरंग स्पोर्ट्सचे पदाधिकारी आणि विविध प्रायोजक परिश्रम घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, या स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 
Top