मुरूम ( प्रतिनिधी)- मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम यांच्या वतीने मुरूम शहरातील मराठी विषयाच्या शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून भाषेप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरूमचे प्राचार्य उल्हास घुरघुरे, प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. सतीश रामपुरे, प्रतिभा निकेतन विद्यालयाचे कांबळे सर तसेच कला व वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. प्रसाद इंगोले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून क्लबचे सचिव कल्लप्पा पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना सुनील राठोड यांनी रोटरी क्लब ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असल्याचे सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे आणि त्यांनी मराठी भाषेवर केलेल्या प्रेमाची दखल घेतली जावी, या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. सतीश रामपुरे यांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनीही मराठी भाषेच्या जतनासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी “मराठी शिक्षकांचा सत्कार म्हणजे प्रत्यक्षात मराठी भाषेचाच सत्कार होय,” असे प्रतिपादन केले. शिक्षकांच्या कार्यामुळेच भाषेची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव कल्लप्पा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूषण पातळे, सुनील राठोड, मल्लिकार्जुन बदोले, कलया स्वामी आणि प्रकाश रोडगे यांनी परिश्रम घेतले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे शिक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
