धाराशिव  (प्रतिनिधी)- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद,धाराशिवमार्फत जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर,आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी शिबिर तसेच विविध शासकीय योजनांबाबत माहितीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुदृढ पत्रकारितेला बळ देण्याच्या उद्देशाने हा संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे.

दि.9 मार्च 2026 रोजी कै.यशवंतराव चव्हाण सभागृह,जिल्हा परिषद धाराशिव येथे हा कार्यक्रम होणार असून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. समाजाच्या जडणघडणीत आणि शासन-जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांचे आरोग्य सुदृढ राहणे ही काळाची गरज ओळखून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पत्रकार नाव नोंदणी सकाळी 10 ते सकाळी 10.30 यादरम्यान करण्यात येईल.शिबिर व कार्यशाळेचे प्रास्ताविक सकाळी 10.30 ते 11 यावेळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष हे करतील.

पत्रकारांची आरोग्य तपासणी आयोजित शिबिरात डॉ.विक्रांत राठोड,डॉ.त्वरिता कावळे व रवी चव्हाण हे करतील. आयुष्मान भारत (आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढणे) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजतापर्यंत काढण्यात येईल.पत्रकारांचे हे कार्ड काढण्याची जबाबदारी डॉ.संतोष आहेर व सुजित पडवळ हे पार पाडतील. जिल्हा परिषद,धाराशिवमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम तसेच शासकीय योजना याबाबत माहिती दुपारी 1.00 ते 2 या वेळेत विभाग प्रमुख,जिल्हा परिषद धाराशिव हे देतील.अल्पोहार व समारोप दुपारी 2 ते 2.30 यावेळेत होईल.

यावेळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात येणार आहे.आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी अद्यावत शिधापत्रिका ऑनलाईन नोंद असणे तसेच आधार कार्ड आवश्यक आहे,असेही जिल्हा परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहिल्यास ऑन-द-स्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पत्रकार सतत धावपळ करत असतात. अनियमित दिनक्रम,प्रवास आणि ताणतणावामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणीसोबतच आरोग्यविमा योजनांची माहिती व नोंदणी सुविधा उपलब्ध करून देणे हा जिल्हा परिषद प्रशासनाचा संवेदनशील आणि दूरदृष्टीचा उपक्रम आहे.

या कार्यक्रमामुळे पत्रकारांना केवळ आरोग्य लाभच मिळणार नाही,तर शासकीय योजनांची अचूक व अधिकृत माहिती मिळणार आहे.परिणामी,ती माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होऊन सुदृढ पत्रकार आणि सक्षम समाज या संकल्पनेला या उपक्रमातून निश्चितच बळ मिळणार आहे. तरी माध्यमांच्या प्रतिनिधींनी आयुष्मान कार्ड व आभा कार्ड काढण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

 
Top