धाराशिव (प्रतिनिधी)- बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून  लक्की जाधव यांच्या विरोधात बंजारा समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला. यासंदर्भात समाजाच्या वतीने निवेदन देऊन संबंधित वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, लक्की जाधव यांनी अलीकडेच एका व्हिडिओच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती देत हा समाज ‌‘अफगाणिस्तानातून आला‌’ असा बिनबुडाचा दावा केला आहे. हा दावा केवळ तथ्यहीन नसून संपूर्ण बंजारा समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचे समाजाच्या वतीने नमूद करण्यात आले.

बंजारा समाज हा भारतातील अत्यंत प्राचीन, लढाऊ व समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणारा समाज असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच व्यापार व सांस्कृतिक विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे समाजाला परकीय ठरवण्याचा प्रयत्न हा समाजाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आणि अपमानास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये ‌‘घुसखोरी‌’ सारखे शब्द वापरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजामध्ये द्वेष पसरू शकतो, त्यामुळे संबंधितांनी अशा विधानांपासून दूर राहावे, अशी मागणीही करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सचिन राठोड (संजय भाऊ राठोड समर्थक), सरपंच लमान राठोड, ॲड. राज राठोड, विशाल जाधव, डॉ. सुरज चव्हाण, शहाजी चव्हाण, अरुण जाधव, अनिल चव्हाण, राजाराम पवार, अरविंद राठोड, आकाश जाधव, रमेश राठोड यांच्यासह बंजारा समाजातील बांधव उपस्थित होते.

 
Top