वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे विज्ञान मंडळाचे बुधवारी दिनांक 4 मार्च रोजी उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ गुरमे व्हि.एम. हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम होते. विज्ञान मंडळाचे संयोजक प्रा.राजाभाऊ बनसोडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये प्रश्न मंजुषा व पोस्टर प्रदर्शन हे उपक्रम राबवण्यात आले.
प्रा.डॉ गुरमे व्हि.एम. यांनी बोलतांना सांगितले की, पदवीधर झाल्यामुळे तुम्हाला पंख मिळतात. नंतर तुम्ही तुमचे आकाश निवडा असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थांना दिला. आजच्या युगातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले.आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.तंत्रज्ञान,वैद्यकीय सेवा,शेती,अंतराळ,संवाद व्यवस्था,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगतीची नवी क्षितिजे खुली केली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, कुतूहल आणि शोधक वृत्ती विकसित व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा या उद्देशाने विज्ञान मंडळाचे उदघाटन करण्यात आले आहे.असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की, या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, भारतीय शास्त्रज्ञांची माहिती देणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.ज्यात प्रदर्शने आणि मार्गदर्शनाचा समावेश आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.विश्वास चौधरी,सुत्रसंचलन प्रा.डॉ पार्थराज क्षीरसागर यांनी केले. तर आभार प्रा.डॉ नेताजी देसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थीनी बहुसंख्येनेउपस्थित होते.
