धाराशिव (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत 27 ते 29 मार्च 2026 दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ, धाराशिव येथे आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव 2026” चा उत्साहात समारोप आज झाला.या महोत्सवाचे उद्घाटन 27 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.
या जिल्हास्तरीय प्रदर्शनात धाराशिव जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे एकूण 42 स्टॉल्स उभारण्यात आले होते.यामध्ये ज्यूस,उसाचा रस, लिंबू सरबत, गावरान तूप, अंडी, वर्मी कंपोस्ट खत, धान्य,कडधान्य,राजमा, कडक भाकरी, शेंगांची चटणी, दुग्धजन्य पदार्थ, मसाले ,पापड, कुरडई, शेवया, मनुके, हस्तकला व शोभेच्या वस्तू, मूर्ती, फ्लॉवर पॉट, रेडीमेड कपडे तसेच विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता.या तिन्ही दिवसांत स्टॉलधारकांची एकूण सुमारे 8 लाख 29 हजार रुपयांची विक्री झाली असून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाच्या समारोप प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव, संरक्षण अधिकारी भुजंग भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर, तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.अध्यक्षा निर्मला उबाळे, स्मिता पाटील, सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात सहभागी सर्व स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते “नवतेजस्विनी महोत्सव 2026” सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी माविम जिल्हा कार्यालय तसेच तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.यांनी विशेष प्रयत्न केले.
