नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करून धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 48 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9.12 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ पोलीस कर्मचारी शासकीय कामकाज करत असताना संशयास्पद आयशर टॅम्पो (क्र. एमएच 16 सीडी 2395) आढळून आला. तपासणी केली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानव आरोग्यास घातक असलेला गोवा गुटखा मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असल्याचे उघड झाले. सदर वाहनातून 50 मोठ्या गोण्या गुटख्याच्या जप्त करण्यात आल्या. यासोबतच आयशर टॅम्पो, एक स्विफ्ट कार आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 48,42,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी संजय सुभाष जगताप (रा. वानेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), सचिन परमेश्वर पवर (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड), सतीश तुकाराम सोंडगे (रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी वाहन कारवाईसाठी ताब्यात घेत असताना आरोपींनी गाडी अडवून “गाडी सोडून दे, नाहीतर तुला बघतो” अशी धमकी देत पोलिसांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर काही इसमांनी आरोपींना चिथावणी देत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी फिर्यादी दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय 41) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. 28 मार्च 2026 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 223, 274, 275, 123, 45, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलिसांकडून सुरू आहे.


 
Top