धाराशिव (प्रतिनिधी)- धारशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे तिरंदाज श्रवण जमादार, स्वराज जाधव आणि अवनी घोडके यांची विविध वयोगटातून राष्ट्रीय धनुर्विध्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली भारतीय धनुर्विध्या महासंघाच्या वतीने दिल्ली येथे घेण्यात आलेल्या खेलो इंडिया ट्रायबल्स अर्चरी स्पर्धा निवड चाचणीत श्रवण जमादार याने कंपाऊंड प्रकारात केलेल्या दमदार कांगिरितून रायपुर (छत्तीसगड) येथे होत असलेल्या खेलो इंडिया अर्चरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले आहे. महाराष्ट्र धनुर्विध्या संघटनेच्या अधिपत्याखाली सोलापूर जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय धनुर्विध्या स्पर्धेतून कंपाऊंड धनुर्धर स्वराज जाधव आणि अवनी घोडके यांची 10 वर्ष वयोगटातून नुमबुरू (आंध्र प्रदेश) येथे होत असलेल्या राष्ट्रीय धनुर्विध्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

दरम्यान धारशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने धनुर्धर श्रवण जमादार, स्वराज जाधव, अवनी घोडके यांना जिल्हा संघटनेचे सचिव प्रविण गडदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी धारशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, यशोदीप कदम आदींसह धनुर्धर, पालकांची मोठ्या प्रमाणात उपास्तिथी होती.


 
Top