धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव, लातूर व बार्शी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर- मुरुड-ढोकी-येडशी-बार्शी-टेंभुर्णी या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी अधिकचे 205 कोटी रूपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.
या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात तसेच मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान तारांकीत प्रश्न विचारला होता. सदर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत वारंवार पाठपुरावा करुन या मार्गाच्या चौपदरीकरणाकरीता अखेर दि. 19 डिसेंबर 2024 रोजी लातूर- मुरुड- ढोकी- येडशी- बार्शी-टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदरीकरणाकरीता 574 कोटी मंजुर करुन घेतले.
या रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारकडून 205.23 कोटी रुपये मंजुर करुन घेतले. यांची प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली असून या निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. या कामामुळे या परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. सदरील काम लवकरात लवकर पुर्ण करण्याकरीता संबंधीतांना सुचना केल्या असून कामाचा नियमीत आढावा घेणार असल्याचेही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
