धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शिक्षक आमदार विक्रम काळे सातत्याने करत आहेत. त्यामुळे विक्रम काळे हे स्व. वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने ते चालवीत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील पळसप येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे उदघाटन रविवारी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, मसापचे संमेलनाध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे, स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, प्राचार्य अनिल काळे, अनुराधा काळे, शुभांगी काळे, व्यंकट बेद्रे, चंद्रकांत बिराजदार, हेमंत जाधव, दत्तात्रय पवार, रमेश बिराजदार, बी. एन. केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथदिंडीने साहित्यनगरी दुमदुमली. तर ग्रंथप्रदर्शनाला साहित्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याचे उद्घाटन डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रप्रदर्शनही लावण्यात आले होते. त्याचे उद्घाटन साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते रसिकांची पावले थबकली.
मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी, स्व. आमदार वसंतराव काळे यांनी जीवन मूल्यांची शिकवण दिली असल्याचे सांगून मराठवाड्यात त्यांनी विचारांचे जाळे निर्माण केले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी, संमेलन आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात, संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत म्हणाले की, बॅरिस्टर सावरकर यांनी 1938 साली साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून मातृभाषा हीच ज्ञान भाषा झाली पाहिजे असा आग्रह धरला होता असे सांगितले. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी तर आभारप्रदर्शन बालाजी इतबारे यांनी केले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. सुरेश सावंत लिखित अनुभवाचे बोल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास मराठवाड्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यिक, कवी, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.