धाराशिव (प्रतिनिधी)- गाव खेड्यातील झगमगाटामध्ये ग्रामीण जीवन बदलत गेले. शहरे वाढत गेली आणि गावे बकाल झाली असे मत सुप्रसिद्ध विचारवंत प्रा.गंगाधरराव हिंगोले यांनी व्यक्त केले.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 11 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात दुपारी बदलते ग्रामीण जीवन या विषयावर प्रा.हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. यावेळी ते बोलत होते. परिसंवादात सुप्रसिद्ध वक्ते कमलाकर कांबळे प्रा.डॉ.कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर) यांनी सहभाग नोंदवला.
प्रा.हिंगोले म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन मोठमोठ्या योजना राबवित आहे पण त्या गरजू पर्यंत पोहचत नाहीत. असेही त्यांनी सांगितले. परिसंवादात कमलाकर कांबळे यांनी ग्रामीण भागातील चित्र बदलत असल्याचे सांगून आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आणि दारात दुचाकी आल्या असल्याचे सांगितले. मराठवाडा मागास म्हणून ओळखला जात असला तरी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात प्रगत आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी लिहिते व्हावे. लोकांच्या हिताचे लेखन करावे, असेही त्यांनी सांगितले प्रा.डॉ.इंगळे यांनीही बदलत्या ग्रामीण जीवनशैलीवर भाष्य करताना पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञाना ने मोठा बदल झाला असल्याचे सांगून श्रेष्ठ नोकरी आणि कनिष्ठ शेती अशी विचारधारा ग्रामीण भागात वाढली असल्याचे सांगितले. परिसंवादाचे सुत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले. आभार राजकुमार मेंढेकर यांनी मानले.