धाराशिव (प्रतिनिधी)-  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर ठाम आणि आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे अशी मागणीही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. 

लोकसभेत बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूरला रेल्वेने जोडण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. धाराशिव ते तुळजापूर या मार्गाचे काम सुरू असले तरी तुळजापूर ते सोलापूर हा टप्पा अजूनही निविदा प्रक्रियेत अडकलेला आहे. या संपूर्ण मार्गासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून केंद्राने आपला 1 हजार कोटी रुपयांचा हिस्सा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येईल. लातूर-पुणे इंटरसिटी गाडी तातडीने सुरू करा. हरंगूळ-पुणे गाडी पुणे मुख्य स्थानकापर्यंत चालवा. कळंब रोड स्थानकावर लातूर-मुंबई गाडीला थांबा देण्यात यावा. ढोकी स्थानकावर नांदेड-पनवेल गाडीला थांबा द्यावा. धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 6 कोटी रूपये निधी मंजूर केल्याबद्दल समाधान व्यक्त करत हे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे. पुणे-सिकंदराबाद जलद गती मार्ग धाराशिव-लातूरमार्गे न्यावा. अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. 

 
Top