कळंब (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र शासनच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तालुक्यातील अनेक महिलांना अद्याप मिळालेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहणे, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांतील त्रुटी यामुळे हजारो लाभार्थी गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर होऊन महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक सहाय्य जमा होत होते. मात्र पडताळणीसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आल्यानंतर अनेकांची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही. परिणामी नोव्हेंबर 25 पासून हप्ते थांबल्याची तक्रार लाभार्थी महिलांकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील महिलांना सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. ‘सर्व्हर डाऊन’, वीजपुरवठ्यातील अडथळे तसेच तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया रखडत असल्याने महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आधीच जमा करूनही अंतिम प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लाभ बंद झाल्याचे सांगितले. माहिती भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्याची चर्चा असून, या कालावधीत ई-केवायसी पूर्ण करण्याची संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.