तुळजापूर (प्रतिनिधी)- हिवाळ्याची थंडी ओसरून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसेंदिवस सूर्याची तीव्रता वाढत असून दुपारच्या वेळेत उष्णतेचा अधिकच त्रास जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
मंदिर परिसरात प्रवेश मार्ग तसेच भाविकांच्या वावराच्या ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आले आहेत. या ग्रीन नेटमुळे थेट सूर्यकिरणांचा परिणाम कमी होऊन परिसरात सावली निर्माण होत आहे. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उन्हाच्या कडाक्यापासून मोठा दिलासा मिळत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत व गर्दीच्या दिवसांत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने उन्हामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन मंदिर संस्थानने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे मंदिर संस्थानचे कर्तव्य मानून अशा सुविधा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत.
ग्रीन नेटच्या माध्यमातून केवळ उन्हापासून संरक्षणच नव्हे तर मंदिर परिसर अधिक शीतल व आरामदायी ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. यामुळे भाविक शांततेत व समाधानाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊ शकत आहेत. श्री तुळजाभवानी देवींच्या भाविकांना उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कटिबद्ध आहे.
