कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथील सुपुत्र प्रा. श्रीराम मुळीक यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत चित्रपट युनियनतर्फे प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या भव्य समारंभात प्रसिद्ध फाईट मास्टर श्री. जावेद हैदर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. श्रीराम मुळीक यांनी आजवर अनेक गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत शिक्षणाची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवली आहे. शिक्षणापुरतेच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तीन अनाथ मुलींच्या विवाहासाठी आर्थिक व मानसिक आधार दिला. तसेच दोन भिकाऱ्यांना व्यवसाय उभा करून देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला, ज्यामुळे ते सन्मानाने उदरनिर्वाह करत आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, चित्रपट अभिनेते सुनील गोडबोले, अजित मामुनकर यांच्यासह मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते. या सन्मानामुळे कळंब व वाशी तालुक्याचा नावलौकिक राज्यपातळीवर उंचावला असून, प्रा. श्रीराम मुळीक यांच्यावर मित्रपरिवार, विद्यार्थी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
