लातूर (प्रतिनिधी)- महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) वीजमीटर उपलबध करून दिले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर वीजदरात सवलत मिळवण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे. लातूर,धाराशिव व बीड जिल्हयाचा समावेश असलेल्या लातूर परिमंडलात आतापर्यंत चार लाख 26 हजार 49 वीजग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीजमीटर बसवण्यात आले असून, त्यांना अचूक बिलासह सवलतीचा लाभ होत आहे. या उपक्रमाबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र ग्राहकांनी अफवेला बळी न पडता स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.
महावितरणने यापूर्वीही काळानुसार वीज मीटर मध्ये बदल केले आहेत. यांत्रिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक मीटर नंतर आता स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जुने, सदोष किंवा नादुरुस्त मीटर बदलणे ही नियमित व कायदेशीर प्रक्रिया असून, त्यासाठी ग्राहकांची लेखीपरवानगी आवश्यक नाही. ग्राहकांकडे बसवण्यात येणारे स्मार्ट टीओडी मीटर मोफत असून, त्यासाठीकोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. यासाठी कोणतेही कर्ज काढलेले नसून केंद्रसरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.लातूर परिमंडलात आजपर्यंत 4 लाख 26 हजार 49 वीजग्राहकांडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. त्यात लातूर मंडलात 2 लाख 384, बीड मंडलात 1 लाख 03 हजार 536 तर धाराशिव मंडलात 1 लाख 22 हजार 123 स्मार्टमीटर सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे बसवण्यात आले आहेत.
विजेच्या दिवसा वापरावर सवलत
स्मार्ट टीओडी मीटर डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार वीज वापर मोजण्याचीसुविधा आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत सवलत मिळत आहे. 1 जुलै 2025 पासून ही सवलत लागू झालीआहे. एखादा घरगुती ग्राहक दरमहा 100 युनिट वीज वापरत असेल, तर जुन्या दरानुसार त्याचेबिल साधारणतः 875 रुपये येत होते. नवीन दरकपात आणि स्मार्ट मीटरच्या टीओडी सवलतीमुळेहेच बिल आता फक्त 784 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
सौर ऊर्जा ग्राहकांसाठी वरदान
प्रधानमंत्री सूर्यघरमोफत वीज योजने अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प लावणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर उपयुक्तआहे. हे मीटर नेट-मीटरिंगचे कामही करते, ज्यामुळे तुम्ही ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज आणि स्वतः वापरलेली वीज याचा अचूक हिशेब ठेवणे सोपे होईल.
सरासरी बिले होणार इतिहास जमा
अचूक रीडिंगमुळे सरासरी किंवा अंदाजे बिलांचा त्रास संपणार आहे. जेवढी वीज वापरली, तेवढेच बिल येणार. मीटर पूर्णपणे पोस्टपेड आहेत. सध्याच्या मासिक पद्धतीप्रमाणेच ग्राहकांना बिल भरायचे आहे. महावितरणच्या खास ॲपवर तुम्हाला तासागणिक किती वीज वापरली जात आहे, याची माहिती मिळेल. घर बंद असले तरी मीटर रीडिंग आपोआप मुख्यालयात नोंदवले जाईल.
