भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सोनेवाडी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सुहास सतीश सोन्ने हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातून 70 वा क्रमांक घेऊन यशस्वी झाला असून त्याने तालुका कृषी अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल सोनेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
सुहास सोन्ने यांचा जन्म सोनेवाडी सारख्या लहानशा गावात सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडिलांचा मुख्य व्यवसाय शेती त्याने शेतीमध्ये करावे लागणारे कष्ट या मुलाने जवळून पाहिल्याने त्याने शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे या ध्येयाने प्रेरित होऊन प्राथमिक माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर लातूर येथील कृषी महाविद्यालयातून कृषी क्षेत्रातून पदवी घेतली. यानंतर एमपीएससीच्या तयारीसाठी पुणे शहर गाठले. अत्यंत जिद्दीन अभ्यास केला आई-वडिलांनी ही शेती करून मुलाला एमपीएससी सारख्या परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत केली. त्याचबरोबर त्यांना असणारी मुलगी स्नेहल तिचेही बीडीएसचे शिक्षण पूर्ण केले. अशा या ध्येय वेड्या सोने कुटुंबाचा सत्कार सोनेवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने वाशी येथील प्राध्यापक शामराव डोके यांच्या हस्ते व सरपंच सतीश सोन्ने यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तसेच यावेळी गावातील युवक संजय सोन्ने याची एचडीएफसी बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट पदी निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. सोनेवाडी सारख्या ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून घवघवी त यश मिळवल्याने सोनेवाडी ग्रामस्थांच्यावतीने फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून गावातील मुख्य रस्त्यावरून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढुन ग्रामपंचायतच्या समोर सुहास सोन्ने, संजय सोन्ने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच सतीश सोन्ने यांनी तर आभार प्रा. भिमराव शिंदे यांनी व्यक्त केले. आपल्या गावातील दोन यशस्वी तरुणांचा सत्कार करण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
