‌


धाराशिव (प्रतिनिधी)-  संपूर्णता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा अर्थात संपूर्णता अभियान 2.0 चा शुभारंभ आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते साईन बोर्डचे अनावरण व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या अभियानाचा कालावधी 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 असा राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, अनंत कुंभार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार म्हणाले की,संपूर्णता अभियान 2.0 अंतर्गत सहा निर्देशांक शंभर टक्के संतृप्त करून यावेळी सुवर्ण पदक मिळविण्याचा निर्धार आहे.‌‘आकांक्षित जिल्हा‌’ ही धाराशिवची ओळख या अभियानाच्या माध्यमातून पुसून टाकायची असून त्यासाठी वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी ते तळागाळातील घटकांपर्यंत सर्वांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील 440 ग्रामपंचायती टी.बी.मुक्त घोषित करण्यात आल्या असून संपूर्ण जिल्हा टी.बी.मुक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

निती आयोगाद्वारे जानेवारी 2018 मध्ये सुरू करण्यात आलेला ‌‘आकांक्षित जिल्हा कार्यक्रम‌’ हा देशातील 112 मागास जिल्ह्यांच्या जलद विकासासाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.  पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास रौप्य पदक तर तालुका कार्यक्रमांतर्गत परंडा तालुक्याला कांस्य पदक मिळाले.या यशात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व चषक देऊन जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी,कृषी अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,मदतनीस व ग्रामसखी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top