भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूमपरांडावाशी मतदारसंघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या भक्कम नेतृत्वावर आणि गेल्या अडीच वर्षांत झालेल्या धडाकेबाज विकासकामांवर विश्वास व्यक्त करत भूम तालुक्यातील राळेसांगवी आणि वालवड येथील अनेक दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे.

मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण विकास यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत आमदार सावंत साहेबांनी राबवलेली विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणींना तात्काळ धावून जाण्याची त्यांची तत्पर भूमिका, यामुळेच आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या नेतृत्वाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे या पक्षप्रवेशातून स्पष्ट झाले आहे.

या पक्षप्रवेश सोहळ्यात राळेसांगवी गावचे विद्यमान सरपंच कमलाकर (आण्णा) कुंभार, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गिरीधर (आण्णा) टाळके, वालवड येथील रंगनाथ पाटोळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य पप्पू चकोर, अमोल कदम, विक्रम चकोर पाटील, दत्ता धोत्रे, कानिफनाथ टाळके यांच्यासह अनेक अनुभवी व तरुण कार्यकर्त्यांनी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांच्या हस्ते शिवबंधनाचा धागा बांधत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

यावेळी आमदार सावंत साहेबांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आस्थेने स्वागत करत भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“हा प्रवेश केवळ काही कार्यकर्त्यांचा नसून, विकासाच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होणाऱ्या एका मोठ्या जनशक्तीचा प्रवेश आहे. शिवसेना म्हणजे विकास, लोकहित आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची ताकद आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांचा उत्साह द्विगुणित केला. या पक्षप्रवेशामुळे भूम तालुक्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली असून आगामी काळात संघटन अधिक मजबूत करून विकासाची घोडदौड वेगाने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. विजयाचा संकल्प, विकासाची साथ आणि आमदार सावंत साहेबांचे मार्गदर्शन घेऊन मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 
Top