धाराशिव (प्रतिनिधी)-  “टेक्निकल टेक्स्टाईल पार्क, एमएसएमई पार्क आणि तीर्थक्षेत्रांच्या कायापालटातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणे, पर्यटनाला उभारी देणे आणि दळणवळणाची सक्षम जाळे निर्माण करण्याचे जे ध्येय आपण ठरवले होते. त्याला या अर्थसंकल्पामुळे मोठी ताकद मिळाली आहे. छोट्या शहरांच्या विकासाच्या कार्यक्रमाला अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. उद्योग आणि पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून मोठी रोजगार निर्मिती होईल. या अर्थसंकल्पामुळे धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. टेक्सटाईल पार्क, एमएसएमई हब आणि तीर्थक्षेत्र विकास या त्रिसूत्रीमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध त्यातून उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या टेम्पल टाऊन संकल्पनेचा सर्वाधिक लाभ तीर्थक्षेत्र तुळजापूरला होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबतच दर्जेदार रस्ते, निवास व्यवस्था आणि स्वच्छता आदी पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. नॅशनल डिजिटल नॉलेज ग्रिडच्या माध्यमातून तुळजापूर संस्थान, नळदुर्ग किल्ला आणि प्राचीन तेरच ऐतिहासिक वारसा जागतिक पातळीवर पोहचणार आहे. आय.आय.एम च्या सहकार्याने 10 हजार पर्यटन मार्गदर्शक तयार केले जाणार आहेत. तुळजापूर, तेर, आणि येडशी येथील तरुणांना यात प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे धाराशिवच्या दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे. यामुळे केवळ प्रवास जलद होणार नाही, तर व्यापार आणि सेवा क्षेत्रालाही मोठी गती मिळणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top